सामूहिक प्रयत्नातून दुष्काळावर मात शक्य

आताच एप्रिलमध्ये मराठवाड्यातील अंबेजोगाई तालुक्यातील पूस येथे श्रीमद् भागवत कथेसाठी जाण्याचा योग आला. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न तसा युद्धजन्य आणि गंभीरच आहे. कुणीतरी म्हटलेलंच आहे कि “पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल!” पण ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय…!
 “तहान लागल्यावर विहीर खणायची” हे जरी मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना सुरु झाल्यावरच जे “पाणी वाचवा” ओरडतो, त्यात ही आहे. पाणी हे काय फक्त एप्रिल लागल्यावर जपून वापरण्यासाठी असतं का ? आज आपल्यापुढे पाण्याचे संकट आहे, दुष्काळाची स्थिती आहे, पण अजूनही येणारा महिना-दीड महिन्याचा काळ आपल्या हातात आहे.  “पाणी जपून वापरा” ही मोहीम आपण वर्षभर का राबवू शकत नाही ?

पाच-सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय काय केले या अभ्यासक्रमापेक्षा आता पाण्याचे व्यवस्थापन अर्थात (Water Management and Water Conservation) हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे अशी सक्ती असायला हवी. जाती-धर्माच्या, राजकीय पक्षांच्या नावाखाली एकमेकांची ‘जिरवण्या’पेक्षा आपण आजपासूनच पाणी कसं ‘जिरवायचं’ याकडे लक्ष दिले तर पाऊस आणि दुष्काळ आपली ‘जिरवणार’ नाही, हे लक्षात घ्या.

आज इजराइल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं. ह्याचं कारण म्हणजे त्यांचा Water Management हा अभ्यास इतका पक्का आहे, कि एकदा नळातून पडलेलं पाणी, हे जवळपास सात वेळा Recycle & Reuse होऊनच शेवटी जमिनीवर पडतं. हे आपण अमलात का आणू शकत नाही ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात यावेळी जलसंवर्धनाचा विषय मांडला. पावसाच्या पाण्याला वाहून न जाऊ देता ते जमिनीत मुरविण्यासाठी अनेक कल्पनाही त्यांनी त्यात मांडल्या आणि त्यानुसार प्रयत्न सुरु आहेत पण मग आपण अजून किती दिवस फक्त सरकारवर अवलंबून राहू शकतो ? “एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ” या उक्तीनुरुप सर्वांच्या प्रयत्नातून या भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या आर्ट ऑफ लिविंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नाम फौंडेशन यांसारख्या अनेक संस्था, मंडळे आणि विविध कंपन्या आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून पाणी अडवण्याकडे गंभीरतेने प्रयत्नशील आहेत. आपणही गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात ‘पाणी वर्षभर कसं वाचवता येईल’ ह्यावर देखावा करुन जागरूकता निर्माण करू शकतो. प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं.

यंदा पाऊस चांगला पडणार ही बातमी आपल्यासाठी जितकी आनंद देणारी आहे, तितकीच आपल्या सगळ्यांसाठी एक संधी निर्माण करणारी आहे. एक आव्हान निर्माण करणारी आहे. गावागावांत पाणी वाचवण्यासाठी एखादी मोहीम आत्तापासूनच आपण हातात घेऊ शकतो का?  शेतकऱ्याना मातीची गरज असते. शेतात पिकांसाठी ती उपयोगी ठरते. मग गावातल्या तळ्यातला गाळ काढून तो आम्ही शेतात टाकला तर? शेतीसाठी फायदा होईलच त्याचबरोबर तळ्यात पाणी साठण्याची क्षमता वाढेल. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमधून, खताच्या रिकाम्या पोत्यांमधून दगड आणि माती भरुन आपण ते पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर टाकले तर? पाणी अडवता येईल का? पाणी पाच दिवस साठेल, सात दिवस साठेल, ते पाणी जमिनीत मुरेल. जमिनीतली पाण्याची पातळी वाढेल. पावसाचे पाणी, गावात पडणारे पाणी गावात राहील. साऱ्यांनी मिळून संकल्प केला आणि सुरुवात केली तर सामूहिक प्रयत्नांमधून हे शक्य आहे.

Advertisements